Car hacking: कार हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ; गेल्या पाच वर्षांत सायबर हल्ले सात टक्क्यांनी वाढले
Car hacking: कारची सुरक्षा आता केवळ अपघातांपासून बचाव करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही

पिंपरी – मोबाइल आणि संगणकाप्रमाणेच आता स्मार्ट कारही सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर येण्याचे प्रमाण वाढत आहे. आधुनिक वाहनांमध्ये ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, स्मार्ट की, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि विविध डिजिटल प्रणालींचा वापर वाढला आहे. या प्रणालींमधील सुरक्षेच्या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स वाहनाच्या डिजिटल यंत्रणेत अनधिकृत प्रवेश मिळवू शकतात.
गेल्या पाच वर्षांत कारवरील सायबर हल्ल्यांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील तज्ज्ञ फारुख मखदूम यांनी दिली.
डाॅ. डी वीय पाटील विद्यापीठात आयोजित ऑटोमोटिव्ह फ्युचर अँड मोबिलिटी समिट २०२६ या कार्यक्रमात ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील तज्ज्ञ फारुख मखदूम यांनी आधुनिक वाहनांमधील सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी स्मार्ट कारवरील वाढते सायबर हल्ले, वाहनांच्या सॉफ्टवेअरमधील सुरक्षा त्रुटी, ब्लॅक हॅट आणि व्हाइट हॅट हॅकर्स यांची कार्यपद्धती तसेच ऑटोमोबाइल क्षेत्रात सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांची वाढती गरज याबाबत मार्गदर्शन केले.
वाहनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना सायबर हल्ले रोखण्यासाठी प्रत्येक डिजिटल प्रणालीची तपासणी, सुरक्षा त्रुटींचे निराकरण आणि सॉफ्टवेअर अपडेट ठेवणे आवश्यक आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत असून, ऑटोमोबाइल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पारंपरिक तांत्रिक शिक्षणासोबत सायबर सिक्युरिटीचे ज्ञान देणारे विशेष अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाच्या संधी विकसित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एक बग हॅकिंगसाठी पुरेसा
मोबाइलमध्ये ज्याप्रमाणे फोटो, वैयक्तिक माहिती आणि इतर डिजिटल अॅसेट्स असतात, त्याचप्रमाणे आधुनिक कारमध्येही अनेक डिजिटल प्रणाली असतात. या प्रणाली इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे हॅकर्सना या प्रणालींमधील त्रुटींचा फायदा घेऊन वाहनाच्या संगणकीय यंत्रणेत प्रवेश मिळवता येतो.
कारमध्ये असंख्य कोड आणि सॉफ्टवेअर कार्यरत असतात. त्यातील एखादा कोड किंवा छोटीशी त्रुटी म्हणजेच ‘बग’ हॅकर्सच्या हाती लागला, तर त्याच्या माध्यमातून संपूर्ण प्रणालीमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ब्लॅक हॅट हॅकर्स अशा त्रुटी शोधून त्यांचा गैरफायदा घेतात आणि कोणतीही वाहने हॅक करु शकतात.
कार हॅक कशी होते?
स्मार्ट कार हॅक करण्यासाठी अनेक मार्गांचा वापर केला जाऊ शकतो. स्मार्ट कीमधून निघणारे सिग्नल पकडून कारचे दरवाजे उघडणे किंव्हा लॉक करणे, ओबीडी पोर्टच्या माध्यमातून वाहनाच्या संगणकीय प्रणालीत प्रवेश मिळवणे, ब्लूटूथ किंवा वाय-फायमधील त्रुटींचा फायदा घेणे, तसेच कारच्या मोबाइल ॲप किंवा सर्व्हरवर हल्ला करून वाहनाचे लोकेशन मिळवणे असे प्रकार घडू शकतात.
काही प्रकरणांत वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणालींमध्ये हस्तक्षेप करण्याचाही धोका असतो. त्यामुळे कारची सुरक्षा आता केवळ अपघातांपासून बचाव करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर डिजिटल सुरक्षाही तितकीच महत्त्वाची ठरत आहे.
Pune District : ३० गुंठ्यांत गोल्डन बेरीचा सोन्यासारखा प्रयोग

