Pune District : चिंबळी भागात रिंगरोडच्या कामाला वेग !
Pune District : खेडचे प्रांत अधिकारी, आळंदीचे मंडल अधिकारी, भूमिअभिलेखचे अधिकारी आणि 'एमएसआरडीसी'च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

चिंबळी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या पुणे रिंगरोड प्रकल्पाची मोजणी चिंबळी (ता. खेड) येथे पूर्ण झाली. जमिनीच्या प्रत्यक्ष संपादनानंतर आता या भागात रस्ते बांधणीच्या कामाला वेग आला आहे.
चिंबळी परिसरातील मोजणी पूर्ण
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (एमएसआरडीसी) पुणे रिंगरोड प्रकल्प युद्धपातळीवर राबवला जात आहे. पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या या रिंगरोडच्या बाह्य रिंगरोड प्रकल्पांतर्गत चिंबळी परिसरातील जमीन मोजणी आणि मार्किंगची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. प्रशासकीय पातळीवर जमीन संपादनाचे काम ९५ टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाल्यामुळे चिंबळी व आसपासच्या परिसरात रस्ते विकासाच्या प्रत्यक्ष कामांना वेग आला आहे.
५० गटांतील २५ हेक्टर जमिनीचे संपादन
चिंबळी येथील शेतकऱ्यांच्या एकूण ५० गटांमधून जाणाऱ्या २५ हेक्टर जमिनीची मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेत रस्त्याचे क्षेत्र, जमिनीतील विहिरी, कूपनलिका, घरे, गोठे आणि फळझाडांची तपशीलवार नोंद करून मार्किंग पूर्ण करण्यात आले. खेडचे प्रांत अधिकारी, आळंदीचे मंडल अधिकारी, भूमिअभिलेखचे अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
चिंबळी हा परिसर चाकण औद्योगिक वसाहतीला (एमआयडीसी) जवळ असल्याने येथे जड- अवजड वाहनांची मोठी वाहतूक असते. या रिंगरोडमुळे चाकण आणि नाशिक महामार्गावरून येणारी अवजड वाहतूक पुणे शहरात न येता थेट हायवेला जोडली जाईल. त्यामुळे चिंबळी, मोशी आणि आळंदी परिसरातील स्थानिक वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटण्यास मदत होईल. सोबत इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.
रिंगरोड प्रकल्पाबाबत महत्वाची माहिती
कामाचे टप्पे : एमएसआरडीसीने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही टप्प्यांतील जमीन संपादनाचे काम अंतिम टप्प्यात आणून मे २०२५ पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात केली.
रुंदीमध्ये बदल : पहिल्या टप्प्यातील तांत्रिक नियोजनानुसार रस्त्याची रुंदी काही प्रमाणात कमी करण्यात आली, त्यामुळे चिंबळी वाहतूक पट्ट्यातील दुसऱ्या टप्प्याच्या रुंदीलाही त्यानुसार समायोजित करण्यात आले.
शांततेत मोजणी : सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये असलेल्या शंकांचे प्रशासनाने निरसन केले असून, घरे आणि फळझाडांचे अचूक मूल्यमापन करून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चिंबळीतील जमीन मालकांशी थेट संवाद साधल्यामुळे मोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली.
हेही वाचा : Pune District : आंबेगाव तालुक्यात जनगणनेचा पहिला टप्पा सुरू





