Nigeria’s Economic Crisis : नायजेरियात आर्थिक संकटाविरोधात प्रचंड निदर्शने, 13जणांचा मृत्यू…

अबुजा : नायजेरियाच्या आर्थिक संकटाविरोधात झालेल्या व्यापक निषेधादरम्यान किमान 13 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. एका मानवाधिकार गटाने शुक्रवारी ही माहिती दिली. अनेक राज्यांमध्ये आंदोलनांना हिंसक वळण लागले असून त्यामुळे अनेक ठिकाणी कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी , बॉम्बस्फोटात चार जण ठार झाल्याची पुष्टी केली आणि देशभरातून शेकडो आंदोलकांना अटक करण्यात आल्याचे सांगितले.
ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे नायजेरियाचे संचालक इसा सनुसी यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मानवाधिकार गटाने प्रत्यक्षदर्शी, पीडितांचे कुटुंब आणि वकिलांनी नोंदवलेल्या मृत्यूची स्वतंत्रपणे पुष्टी केली आहे.
दरम्यान, नायजेरियन पोलिसांनी सांगितले की, सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेची लूट सुरू असताना उत्तरेकडील कानो आणि कट्सिना या राज्यांमध्ये 300 हून अधिक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे आणि त्याठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारीही ठार झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलक वाढत्या आर्थिक संकटाचा अंत करण्याची मागणी करत आहेत, ज्यामुळे आफ्रिकेतील सर्वोच्च तेल उत्पादक देशातील लोक सर्वात सध्या वाईट काळातून जात आहेत. भ्रष्टाचार आणि कुशासन बंद करण्याची मागणी देखील आंदोलक करत आहेत. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये दिसलेल्या निषेधाच्या व्हिडिओंमध्ये, काही आंदोलक गोदामे लुटताना आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करताना दिसत आहेत. परिस्थिती पाहता तीन राज्यपालांनी आपापल्या राज्यात कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.





