श्रीमंत महापालिकेच्या शाळाच स्वच्छतागृहाविना!

विद्यार्थ्यांच्या कुचंबनेला जबादार कोण?
पिंपरी – श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांची अवस्था मागील काही वर्षांपासून दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही महापालिका अनेक शाळांना मुलभूत सोयी पुरवण्यातही अपयशी ठरत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. आता वर्षभर स्वचछतेचे धडे देणाऱ्या महापालिकेच्या शाळांमध्येच मुलांसाठी स्वच्छतागृह नसल्याची धक्कायदायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या 27 शाळांमध्ये स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांची कुंचबना होत असून विद्यार्थ्याच्या कुचंबनेला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जावू लागला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विषेशत: सर्वसामान्य आणि गरीबांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे, या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, वह्या सोबतच दप्तर आणि इतर सोयी सुविधाही पुरवण्यात येतात. विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष चांगल्या दर्जाची शालेय साधणे पोहचतच नसल्याने यावरही प्रश्नचिन्ह उभारले आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांच्या प्रभावामुळे महापालिकेच्या शाळेची पटसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळे, महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व शाळांना भेटी देवून शाळांची पाहाणी केली होती. या पाहणी दरम्यान सुरु असलेल्या 105 शाळांपैकी 27 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालये नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्वच्छतागृहच नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असून याबाबत शाळेतील शिक्षकांनी महापालिकेला कळवूनही स्वच्छतागृह उपलब्ध करुन दिलेली नाहीत. ज्या शाळांमध्ये स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र सोय नाही. तर काही ठिकाणी केवळ मुलींसाठी स्वच्छतागृह आहे तर त्याची अवस्था अतिशय दयनिय आहे.
एकीकडे महापालिका स्वच्छता अभियान राबवून देशपातळीवर क्रमांक मिळविण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी जनजागृतीवर कोट्यवधी रुपये खर्चही करण्यात येत आहेत. मात्र, महापालिका आपल्या शाळेतच मुलभूत सविधा उपलब्ध करुन देत नसेल तर महापालिकेचे अधिकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या सुविधेसाठी किती जागरुक आहे हे यावरुन दिसून येत आहे. त्यामुळे, शाळांमध्ये लवकरात लवकर स्वच्छतागृह बांधावे व विद्यार्थ्यांची होणारी कुचंबना थांबवावी, अशी मागणी होत आहे.





