Pune Ganeshotsav 2024 : दगडूशेठ बाप्पांची ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते होणार प्रतिष्ठापना….

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची शनिवारी (७ सप्टेंबर) कर्नाटकातील हुमनाबाद येथील श्री दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी प्रतिष्ठापना होणार आहे. ट्रस्टच्या वतीने साकारण्यात आलेल्या हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृतीवरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते याच दिवशी सायंकाळी होणार आहे.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण या वेळी उपस्थित होते. गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून, दोन सिंहाच्या प्रतिकृती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी बारापासून भाविकांना गणरायाचे दर्शन घेता येणार आहे.
विसर्जन मिरवणुकीत चार वाजता सहभाग
गणेश विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेला श्रीमंत दगडूशेठ गणपती यंदाही अनंतचतुर्दशीला दुपारी चार वाजता लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे. भाविकांच्या मागणीनुसार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षीपासून विसर्जन मिरवणुकीची वेळ बदलली. पोलीस, प्रशासन, नागरिक, अन्य गणेश मंडळे या सर्वांनाच हा निर्णय पटला. त्यामुळे यंदाही तीच परंपरा कायम ठेवत मानाचे गणपती मार्गस्थ झाल्यावर विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याची निर्णय ट्रस्टने घेतला आहे. – हेमंत रासने, सरचिटणीस, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट
गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये
– ॠषिपंचमीनिमित्त रविवारी (८ सप्टेंबर) पहाटे सहा वाजता महिलांच्या अर्थवशीर्ष पठणास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांची उपस्थिती
– दररोज पहाटे पाचपासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत गणेशयाग आणि दुपारी बारा ते चार या वेळेत दाक्षिणात्य पद्धतीने गणेशयाग
– जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत तीन ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा
– गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा, उत्सवावर तब्बल दीडशे कॅमेऱ्यांद्वारे लक्ष, चार एलईडी पडद्यांची सोय




