धक्कादायक ! श्रीमंत देशांनी केलाय लोकसंख्येच्या पाच पट लसींचा साठा

जिनेव्हा- जगातील काही श्रीमंत देशांनी त्यांच्या लोकसंख्येच्या 5 पटीपर्यंत करोना लसी खरेदी करुन ठेवल्या असल्याची बातमी आहे. त्यामुळे जगभरात याचे पडसाद उमटत आहेत.
या मुद्द्यावर जागतिक आरोग्य संघटनेनेही नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी अधिक पट करोना लसींचा साठा करणाऱ्या देशांमध्ये सर्वात पहिला क्रमांक कॅनडाचा लागतो. त्यानंतर इंग्लंड, युरोपियन संघ, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचा समावेश आहे.
ड्युक ग्लोबल हेल्थ इनोव्हेश सेंटरच्या आकडेवारीनुसार, कॅनडाने सद्यस्थितीला करोना लसींचे 338 मिलियन (33 कोटी 80 लाख) डोसची खरेदी केली आहे. ही संख्या कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल 5 पट आहे. म्हणजेच कॅनडामधील प्रत्येक नागरिकाला दोन करोना लसीचे डोस दिले तरी कोट्यवधी डोस शिल्लक राहतील.
इंग्लंडने सध्या 45 कोटी 70 लाख करोना लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. करोना लसीची ही संख्या इंग्लंडमधील लोकसंख्येच्या 3.6 पट आहे.
युरोपियन संघातील 28 देशांनी एकूण लोकसंख्येच्या 2.7 पट करोना लसी मागवल्या आहेत. त्यांनी 180 कोटी (1.8 बिलियन) करोना लसी खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. ऑस्ट्रेलियाने 12 कोटी 40 लाख लसींच्या खरेदीची ऑर्डर दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येच्या 2.5 पट आहे. अमेरिकेने देखील आपल्या लोकसंख्येच्या दुप्पट करोना लसींची ऑर्डर दिली आहे. अमेरिका 120 कोटी करोना लसींची खरेदी करत आहे



