आदिवासी भागातील भातशेती झोपली

चिव्हेवाडीत आस्मानी संकट : कातुरजाई मंदिरावर दगड-गोट्यांचा खच
काळदरी – पुरंदर किल्ल्याच्या नजीकच वसलेल्या चिव्हेवाडी गावावर निसर्गाचा प्रकोप झाला असून, नुकत्याच झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे चिव्हेवाडी येथील कातुरजाई मंदिर, नळ पाणीपुरवठा विहीर, चिव्हेवाडी घाट रस्ता, शेतकऱ्यांच्या खासगी विहिरी आणि भात खाचऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
बुधवारी (दि. 25) मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमध्ये आदिवासी बहुल क्षेत्र असणाऱ्या चिव्हेवाडी गावात अस्मानी संकट कोसळले होते. रात्रभर झालेल्या धुवाधार पावसात येथील डोंगर माथ्यावरील दरड कोसळल्याने दगड गोटे शेतात वाहून आले. कातूरजाई मंदिराला तर दगड गोट्यांचा वेढा पडला होता.
चिव्हेवाडी गावातील मुख्य पीक भाताचे असून संपूर्ण पिकच गाडून गेले आहे. दगडगोटे वाहून आल्याने संपूर्ण शेतजमीन नापीक बनली आहे. येथील भातशेतीचे नुकसान झालेले असून, मुख्य पीक हातातून गेल्याने आदिवासी शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यमंत्री विजय शिवतारे, संजय जगताप, जिल्हा परिषद दिलीप यादव, हरिभाऊ लोळे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बांधकाम अभियंता रोहिदास साबळे, चिव्हेवाडी गावचे सरपंच दीपक चिव्हे, माजी सरपंच भाऊसाहेब वाशिलकर, ग्रामसेवक दादासाहेब भवर, तलाठी आर. टी. राठोड, ज्ञानेश्वर रांजणे, अनंता चिव्हे, दशरथ चिव्हे, प्रकाश चिव्हे, दादा चिव्हे, बाबुराव चिव्हे आदी उपस्थित होते. चिव्हेवाडी घाटातील रस्ता दुरुस्ती करण्याबरोबरच भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश शिवतारे यांनी दिले आहेत.



