इन्कम टॅक्स पोर्टलसंबंधात आढावा बैठक

नवी दिल्ली – इन्फोसिस कंपनीने तयार केलेले इन्कम टॅक्स पार्टल आता व्यवस्थित चालू असून आतापर्यंत साडेतीन कोटींपेक्षा जास्त करदात्यांनी विवरण सादर केले आहे. या पोर्टलमध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी इन्फोसिस कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत आढावा बैठक घेतली.
यावेळी महसूल सचिव तरुण बजाज आणि इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सलिल पारेख उपस्थित होते. अगोदर या पोर्टल मध्ये अडचणी येत होत्या. मात्र आता हे पोर्टल सुरळीत काम करीत आहे. पोर्टलच्या कार्यक्षमतेचा आढावा घेण्यासाठी कंपनीने वार रूम तयार करावी अशी सूचना यावेळी इन्फोसिस कंपनीला देण्यात आली.
करोना आणि इतर कारणामुळे अनेकदा विवरण भरण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. त्या अगोदर तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये याकरिता इन्फोसिस कंपनी आणि अर्थमंत्रालय प्रयत्न करीत आहे.


