Nagar : मुळा धरणातून आज शेतीसाठी आवर्तन

राहुरी : मुळा धरणातून उजवा कालवा व वांबोरी चारीला आज पाणी सोडण्यात येणार असून, जोगेश्वरी आखाडा येथील पुलाची दुरुस्ती झाल्यानंतर आठ दिवसांत डाव्या कालव्याला देखील पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह आमदार मोनिका राजळे, आ. विठ्ठलराव लंघे व अधिकारी उपस्थित होते.
आमदार कर्डिले यांनी सांगितले की, मुळा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यासह वांबोरी चारीला पाणी सोडावे, अशी शेतकरी व नागरिकांची मागणी होती. त्यामुळे बैठकीत मंत्री विखे यांनी पाणी सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मुळा धरणातून उजव्या कालव्याला त्याचप्रमाणे वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे.
तसेच जोगेश्वरी आखाडा येथील पुलाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांत डाव्या कालव्याला देखील पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणातून उजवा कालवा व वांबोरी चारीला व त्यानंतर डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.





