Jyotiraditya Scindia : 18 वर्षात सरकारी टेलिकॉम कंपन्यांची कमाई वाढली; दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने १८ वर्षांत प्रथमच नफा कमावला आहे. भारत संचार निगम लिमिटेडने १८ वर्षांत प्रथमच नफा कमावला आहे, अशी माहिती दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सिंधिया म्हणाले की, ऑक्टोबर-डिसेंबर २०२४ या तिमाहीत बीएसएनएलने २६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यापूर्वी २००७ मध्ये निव्वळ नफा नोंदवण्यात आला होता.
दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात, सिंधिया म्हणाले की, देशात ५ जीची व्याप्ती सर्वात वेगाने वाढत आहे. भारत हा जगातील पाचवा देश आहे जो आपल्या संप्रेषण प्रणालीमध्ये स्वदेशी निर्मित उपकरणे वापरतो. यापूर्वी, फक्त फिनलंड, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीन हे देश संप्रेषण प्रणालीसाठी उपकरणे तयार करत होते. भारत आपल्या संप्रेषण प्रणालीमध्ये स्वदेशी बनावटीची उपकरणे वापरत आहे.
देशात संपर्काचा विस्तार करण्यासाठी एक लाख मोबाईल टॉवर बसवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सिंधिया यांनी सांगितले. ४जी सेवा ९९ टक्के जमिनीवर आणि ८२ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचल्या आहेत. देशात सॅटेलाइट फोनचा वैयक्तिक वापर करण्यास मनाई आहे. त्याच्या वापरासाठी विशेष परवाने दिले जातात. सीमावर्ती भागात दळणवळण सेवांचा विस्तार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, अतिरेकी डाव्या विचारसरणीने प्रभावित भागात मोबाईल टॉवर्स देखील बसवले जात आहेत.
भारतात डेटा सर्वात स्वस्त
दुसऱ्या एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात मंत्री सिंधिया म्हणाले की, मोबाईल फोन सेवा आणि डेटाची किंमत भारतात सर्वात कमी आहे. सॅटेलाइट इंटरनेट स्पेक्ट्रमच्या वाटपात भारतीय हितांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय बाजारपेठेचे स्वतःचे मानक आहेत आणि परदेशी कंपन्यांना त्यांचे पालन करावे लागेल. भारत ही इंटरनेटची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि जगातील प्रत्येक कंपनी भारतात येण्यास इच्छुक आहे, असे ते म्हणाले. या कंपन्यांना भारतात ‘एक्झिट पॉइंट्स’ अनिवार्यपणे स्थापित करावे लागतील. सध्या, रिलायन्स आणि भारती एअरटेलकडे देशात सॅटेलाइट स्पेक्ट्रम आहे.





