बीडमध्ये अत्याचाराचा बदला खून; तरुणाला दिवसाढवळ्या कोयत्याने संपविले

बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबाजोगाई येथे एका युवकाची कोयत्याने भरदिवसा हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी (दि.१) ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय-३०, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असे हत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या युवकाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे तिने आत्महत्या केली होती. त्यामुळे संतप्त झालेला महिलेचा पती, मुलाने त्यालाच संपविले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार करडे हा दोन वर्षांपासून शॉर्ट फिल्म बनवत होता. चेनई येथील एका युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते. तो नेहमी सांगायचा माझे तिच्यावर प्रेम आहे. आम्ही दोघे लग्न करणार आहोत. परंतु जात समजल्याने तिचे वडील लग्नाला विरोध करत आहेत. नेहमी मला माझ्या मुलीचा नाद सोड नाही तर जिवे मारून टाकू, अशा धमक्या देत असल्याचे राजकुमार करडे याने आईला सांगितले होते. यावरून मृत राजकुमार करडेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वैजनाथ शिंदे, वेदांत शिंदे या बापलेकासह आदिनाथ भांडे यांनी सकाळी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. या खुनाचा तपास पोलिस उपअधीक्षक चोरमले करीत आहेत.
प्रेयसीच्या आईची आत्महत्या
राजकुमार याचे ज्या तरुणीसोबत प्रेम होते, तिच्या आईवर लातूर येथे लॉजवर बलात्कार केला होता. आई, मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी तो देत असे. त्यामुळे प्रेयसीच्या आईने माहेरी डिघोळअंबा येथे गळफास घेऊन ११ सप्टेंबर २०२३ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रेयसीचे वडील व भाऊ यांनी त्याचा खून केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत पीडित महिलेने लातूर येथील गांधीनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रारही दिली होती.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या पीडितेच्या अंगावरील जॅकेटच्या खिशात चिठ्ठी मिळून आली होती. आजपर्यंत जे झाले ते सहन केले. पण आता सहन होत नाही. माझ्या कुटुंबाला व मुलांना आणि आई-वडिलांना यापुढे कुणी त्रास देऊ नये. एवढीच शेवटची इच्छा. आजपर्यंत आशा होती की, मी यातून बाहेर येईल म्हणून, पण जेवढ्या धमक्या आजपर्यंत त्याने दिल्या, त्या सगळ्या सहन केल्या. आता बस्स आता त्याला शिक्षा झाली पाहिजे. मला यातून कुणी बाहेर नाही काढू शकले, पण माझ्यानंतर मी मेल्यानंतर तरी त्याला शिक्षा भेटावी. माझी इज्जत घालवली त्याने म्हणून मी आत्महत्या करत आहे.





