Tinnu Anand : रुग्णालयातून घरी परतले, पण वेदना कायम; टीनू आनंद यांना नेमकं काय झालयं?
Tinnu Anand : उपचारादरम्यान त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

Tinnu Anand : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते टिन्नू आनंद यांच्या हेल्थ अपडेटबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. गंभीर दुखापतीमुळे त्यांना रुग्णालयात उपचारांकरिता दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत डॅाक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी टिन्नू आनंद यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. त्यांच्या पाच बरगड्या मोडल्या होत्या, तसेच फुफ्फुसालाही दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
घरीच उपचार आणि फिजिओथेरपी सुरू
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर टिन्नू आनंद यांच्यावर आता घरीच उपचार सुरू आहेत. दुखापतीमुळे त्यांना बसताना, उभे राहताना, चालताना तसेच झोपतानाही त्रास होत आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी घरीच फिजिओथेरपी केली जात आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या कोणतेही काम न करता विश्रांती घेण्याची सक्त ताकीद दिली आहे.
दरम्यान, टिन्नू आनंद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. ते लवकरात लवकर पूर्णपणे बरे होऊन पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय व्हावेत, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दुखापतीतही निर्मात्यांचे कामासाठी फोन
एकीकडे टिन्नू आनंद वेदनांशी झुंज देत असताना दुसरीकडे त्यांना कामासंदर्भात निर्मात्यांचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. काही चित्रपटांचे डबिंग पूर्ण करण्यासाठी निर्माते त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. मात्र, सध्याची शारीरिक स्थिती पाहता ते लगेच कामाला सुरुवात करू शकतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
अभिनयासोबत दिग्दर्शनातही उमटवला ठसा
टिन्नू आनंद हे अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा महत्त्वाचा भाग आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘पेड्डी’ या चित्रपटातही ते झळकले होते.
Raj Thackeray : छठ पूजा करण्यावरून वाद पेटला; राज ठाकरे संतापले म्हणाले “उत्तर भारतीयांना आणि…”






