‘पिफ 2020’मधील चुकवू नये असा रेट्रोस्पेक्टिव्ह…

18 व्या पिफ म्हणजेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गुरुवारी उद्घाटन झाले. पण खऱ्या अर्थाने पिफची सुरुवात ही शुक्रवारपासून होईल. शेड्युलमधील चित्रपटांची नावं शोधून त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळी पोहोचायची डेलिगेट्सची लगबग शुक्रवारपासून सुरू होईल.
गेली काही वर्षे सिटी प्राईड, कोथरूड येथे होणारा पिफ यंदा तिथे होत नाहीये, हा एक प्रमुख बदल डेलिगेट्स लक्षात घेत आहेत. पिफमधील नवीन ठिकाणांची सवय होण्यासाठी एक-दोन दिवस जावे लागतील. नवीन दशकाच्या निमित्ताने पिफमधील हा नवीन बदल डेलिगेट्स कशा पद्धतीने स्वीकारतात हे येत्या काही दिवसांत कळेलच.
दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा डेलिगेट्समध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह विभागाची चर्चा आहे. गेल्या काही पिफमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांबद्दल डेलिगेट्सना खूप उत्सुकता असते. आपल्या आवडत्या कलाकाराचे चित्रपट या विभागात बघायला मिळावेत, असं त्यांना वाटत असतं. यंदा 18 व्या पिफमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात चोखंदळ चित्रपट रसिकांच्या कायम लक्षात राहिलेले असे काही चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. भारतीय चित्रपट सुष्टीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे, असे प्रसिद्ध लेखक- दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे ऋषिदा यांनी दिग्दर्शित केलेल्या काही अजरामर कलाकृती पुणेकरांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची एक नामी संधी मिळणार आहे.
बाबूमोशाय म्हणत आयुष्य खूप सुंदर आहे हे सांगणारा राजेश खन्ना प्रमुख भूमिकेत असणारा “आनंद'(1971), राज कपूर-नूतन यांच्या सुरेख अशा नैसर्गिक अभिनयाने नटलेला “अनाडी’ (1959), अनुराधा (1960), देवानंद यांच्या बहारदार अभिनयाची साक्ष देणारा असली-नकली (1962), दिलीप कुमार- किशोर कुमार-निरुपा रॉय अशी तंगडी स्टारकास्ट असणारा मुसाफिर (1962) या हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर कलाकृतींचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे.
याशिवाय इटलीचे प्रसिद्ध दिग्दर्शक फेडेरिको फेलिनी यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात दाखवण्यात येणार आहेत. इटलीमधील मॉर्डन दिग्दर्शक असं फेडेरिको फेलीनी यांची ओळख आहे.
रेट्रोस्पेक्टिव्ह विभागाप्रमाणेच यंदा पिफमध्ये इतर काही खास विभाग आहेत, ज्यात दर्जेदार असे चित्रपट दाखवले जाणार आहेत, त्याबद्दलची माहिती येणाऱ्या लेखांमध्ये घेऊयात.






