मुंबई : ३० डिसेंबर १९८५ रोजी नौदलात रुजू झालेली आणि ४० वर्षांची सेवा देऊन १२ जानेवारी २०२५ रोजी निवृत्त झालेली आयएनएस गुलदार युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. लवकरच कोकणातील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीत बुडवून तिचे संग्रहालय करण्यात येईल आणि पर्यटकांना ही युद्धनौका थेट पाण्याखाली जाऊन पाहता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. या युद्धनौकेला शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर ती विजयदुर्ग खाडीत बुडवण्यात येईल. मग प्रमाणित स्कूबा डायव्हरच्या माध्यमातून पर्यटकांना दर्शन घेता येणार आहे. स्कूबा डायव्हिंगची भीती वाटते, त्यांच्यासाठी एमटीडीसी एक पाणबुडी विकत घेणार आहे. मालवणच्या वेंगुर्ल्याजवळील निवती समुद्रात अंडरवॉटर म्युझियम आणि आर्टिफिशियल रीफसाठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका एमटीडीसीने मागितली होती. म्हणून विजयदुर्गची निवड मराठ्यांच्या अधिपत्याखाली तब्बल १०५ वर्षे किल्ले विजयदुर्ग असल्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊन हा प्रकल्प येथे आणण्यात आला आहे. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण येथे युद्धनौका बांधणीचा कारखाना उभारला होता. यामध्ये आरमारी युद्धनीतीसाठी महाकाय गलबते, पडाव, पालव, गुराब, मचवा अशा असंख्य प्रकारच्या युद्धनौका बांधल्या जात होत्या. या नौकांसाठी अत्यंत सुरक्षित अशी विजयदुर्गच्या बाजूस असलेली वाघवट खाडी निश्चित करण्यात आली होती. ही खाडी सुमारे ४२ किलोमीटर लांब आणि ४०-५० मीटर खोल आहे. नागमोडी वळण आणि खाडीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्याने ती कोणत्याही वादळ-वाऱ्यांपासून सुरक्षित मानली जाते. अशी आहेत वैशिष्ट्ये ३० डिसेंबर १९८५ रोजी गुलदारचा नौदलात समावेश करण्यात आला. तिचे वजन : १२०० टन असून लांबी : ८१ मीटर आहे. तर रुंदी : १० मीटर आहे. सक्षम अधिकारी व कर्मचारी-६, खलाशी ८५, वाहन क्षमता : चिलखती कर्मचारी वाहक, रणगाडे (टँक), स्वयं-चालित तोफा, ट्रक, १५० पेक्षा अधिक सैन्य, सामरिक सामर्थ्य आणि संरक्षण, अशी आहे.