ओझर (पुणे जिल्हा)- योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव मोरे यांनी सेवेतून निवृत झाल्यानंतर गावाकडील शेतीकडे विशेष लक्ष देऊन ऊसाचे एकरी ११० टन उत्पादन घेतले आहे. ऊसाला सुमारे ५० च्या जवळपास कांडे लागले आहेत. मोरे यांनी आपल्या एक हेक्टर क्षेत्रात जून २०२३ मध्ये ८६०३२ या वाणाच्या आडसाली ऊसाच्या कांड्याची सरी पद्धतीने लागवड केली. मोरे यांच्या एक हेक्टर क्षेत्रातील ऊसाची नुकतीच तोडणी झाली आहे. एक हेक्टर क्षेत्रातील ३१३ टन ऊस येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास गेला आहे. एका ऊसाचे वजन चार ते पाच किलो आहे. लागवडीपूर्वी एकरी तीन ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर वाढीसाठी रासायनिक खते व औषधांच्या चार ते पाच फवारण्या केल्या. विहिरीवरून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली. पाण्यामधून जिवाणू खते दिली. त्यामुळे ऊसाची चांगली वाढ झाली, शिरोली खुर्द येथील माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य सुभाष सीताराम मोरे यांनी ऊस पिकासाठी पिकासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ऊस लागवडीपासून योग्य व्यवस्थापन केल्याने ऊसाची चांगली वाढ होण्यास मदत झाली. शेतीची आवड असल्याने निवृत्तीनंतर शेती करण्याचा निर्णय घेतला, तो यशस्वी ठरला असल्याचे मोरे यांनी सांगितले.