नेवासा : सेवानिवृत्त प्राध्यापक डी.के.मांडलिक यांची अद्भुत गरुडझेप…;आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले कौतुक

नेवासा: नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरे शिवारातील लाखेफळ गावाच्या एका ग्रामीण भागात पर्यटकांसाठी प्राध्यापक डी. के. मांडलिक यांनी निसर्गरम्य आणि मनमोहक वातावरणात कृषी पर्यटन क्षेत्राची निर्मिती करुन एक आदर्श निर्माण केला आहे. ही एक मोठी कौतुकास्पद बाब असून प्रा. मांडलिक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कृषी पर्यटनामुळे ग्रामीण भागातून शहराकडे नव्हे तर आता शहरातून ग्रामीण भागाकडे पर्यटक या सुंदर आणि मनमोहक वातावरणातील निसर्गरम्य क्षेत्राचा आनंद लुटण्यासाठी धाव घेणार असल्याचे गौरोद्गार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी काढले.
शुक्रवार (दि.१४) रोजी प्रा.डी.के.मांडलिक यांनी सुरु केलेल्या अॅग्रो टुरिझम आणि “अमृतकलश’’ या कांदबरीचा प्रकाशन सोहळा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध चिञपट गीतकार बाबासाहेब सौदागर, प्रा. डी .के.मांडलिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते अब्दूलभैय्या शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे, लेखिका लीलाताई गोविलकर, विजयकुमार नेटके, प्रा.स्नेहल आढाव, अॅड.कल्याणराव पिसाळ, माजी सरपंच प्रकाश वाघमारे, प्रा. सुमिञा बांगर, नानासाहेब चिंधे, अॅड. सुभाष सकट,अॅड. विशाल मांडलिक, अॅड.श्रद्धा मांडलिक, प्रा. प्रदिप घोरपडे, पल्लवी घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील भूमिपुत्र असणाऱ्या प्राध्यापक डी.के.मांडलिक यांनी बहुचर्चित असलेला आपला “ग्रीन गॅलेक्सी अॅग्रो टुरिझम “या प्रकल्पाचे उद्घाटन मोठ्या दिमाखदार सोहळ्यात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी लिहिलेल्या “अमृतकलश” या कादंबरीचा प्रकाशन सोहळाही यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये प्रा. डी. के. मांडलिक सरांना सुचलेली ही कल्पना निश्चित वाखाणण्याजोगी आहे. बराचसा समाज हा खेड्याकडून शहराकडे पलायन करत असताना ग्रामीण भागात नेत्रदिपक पर्यटन क्षेत्र उपक्रम राबवून तसेच या टुरिझमच्या माध्यमातून दळणवळण आणि रोजगाराची साधने निर्माण करुन पर्यटकांसाठी ही एक मोठी पर्वणीच निर्माण केली असल्याचे यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी बोलताना सांगितले.
या निसर्गरम्य शांत आणि सुंदर वातावरणात वनस्पती, झाडे, पक्षी आणि नैसर्गिक वातावरणात फिरल्यामुळे मन शांत होते. तसेच ताण कमी होवून शरीराला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळण्याचा आनंद या ठिकाणी आलेल्या विविध मान्यवरांनी निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत सुंदर दृश्यांचा फायदा घेत मोठा आनंद लुटला.
प्रा. डी. के. मांडलिक लिखित “अमृतकलश’’ या कांदबरीचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबाबासाहेब सौदागर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी लेखक कवी आणि साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या मांदियाळात हा कार्यक्रम संपन्न झाला.





