हायरिस्क भागांतच होणार फेरसर्व्हेक्षण

7 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आढळले मोठ्या प्रमाणात रुग्ण
पुणे – करोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेकडून संपूर्ण शहर संशयित रुग्ण शोधून काढण्यासाठी पिंजून काढले जात आहे. तर, अनेक भागांतील सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे पालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्याच भागात फेरसर्व्हेक्षण केले जाणार आहे. शहरात करोनाचे रुग्ण 7 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे जसजसे रुग्ण वाढत जातील तसतसे त्या प्रभागात फेरसर्व्हेक्षण केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
शहरात 9 मार्चला करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर पालिकेकडून आधी केवळ त्या भागाचेच सर्व्हेक्षण केले जात होते. त्यात संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती तसेच 5 किलोमीटरच्या परिसराचे सर्व्हेक्षण केले जात होते. मात्र, सर्वच भागात रुग्ण आढळल्यानंतर पालिकेने घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात सुमारे 60 टक्के घराचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काही दिवसांत पूर्ण होईल. पण दरम्यानच्या कालावधीत भवानी पेठ, कसबा-विश्रामबाग वाडा, बिबवेवाडी, धनकवडी, सहकारनगर, वारजे, कळस- धानोरी- येरवडा, ढोले पाटील रस्ता व हडपसर या भागांत रुग्णांची संख्या अचानक वाढण्यास सुरुवात झाली आहे.
परिणामी या भागांत महापालिकेकडून रुग्ण सापडलेल्या परिसरात पुन्हा एकदा हायरिस्क एरिया म्हणून सर्वेक्षण करण्यात आले आहे. परिणामी, याबाबत दुसऱ्यांदा नागरिकांची तपासणी होणार आहे. त्यामुळे या पूर्वी सर्व्हेक्षण झाले तरी अशा भागांत नागरिकांनी सर्व्हेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तर, या हायरिस्क भागांत आतापर्यंत सुमारे 6 हजार 870 घरांची तपासणी केली असून 24,324 व्यक्तींचा त्यात समावेश आहे. तर, यात 8 जणांना करोना सदृश लक्षणे आढळली असल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करून घेतले आहे.





