अकार्यक्षम NBFCवर निर्बंध येणार; रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई – आतापर्यंत आर्थिक परिस्थिती खराब झालेल्या बॅंकावर रिझर्व बॅंकेचे निर्बंध येत होते. आता हा नियम बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांना म्हणजे एनबीएफसींना लागू होणार आहे.
त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना रिझर्व बॅंकेने जारी केल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार एनबीएफसीची परिस्थिती पाहून 1 ऑक्टोबर पासून किंवा 31 मार्च 2022 नंतर या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. रिझर्व बॅंकेचे बॅंकांच्या आर्थिक परिस्थितीच्या मोजमापासाठी काही निकष आहेत. हे निकष पूर्ण न करणाऱ्या बॅंकांवर आत्तापर्यंत निर्बंध लादले जात होते. आता अशा प्रकारचे निकष एनबीएफसीना लागू करण्यात येणार आहेत.
भारतातील एनबीएफसीची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर या संस्थांचा मुख्य अर्थव्यवस्थेशी संबंध वाढत आहे. त्यामुळे एनबीएफसीचे बॅंकांप्रमाणे नियमन करण्याची गरज निर्माण झाली आहे. हा नियम ठेवी स्वीकारणाऱ्या एनबीएफसीना लागू होणार आहे. ठेवी न स्वीकारणाऱ्या एनबीएफसी आणि सरकारी कंपन्यांना हा नियम लागू होणार नाही.
त्यामुळे आगामी काळात एनबीएफसीना भांडवली परिस्थिती आटोक्यात ठेवावी लागणार आहे. त्याचबरोबर अनुत्पादक मालमत्ता 6 टक्क्यांच्या आत ठेवावी लागणार आहे. रिझर्व बॅंक निकष पुर्ण न करणाऱ्या एनबीएफसीची पाहणी करेल आणि आवश्यक ते निर्बंध लागू करणार आहे. निर्बंध किती प्रमाणात लावायचे हे एनबीएफसीची परिस्थिती किती खराब आहे यावर अवलंबून असेल असे दिसून येते




