Pune : प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीवर निर्बंध

पुणे : वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून दि. २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत फ्लॅटफाॅर्म तिकिट विक्रीवर हे निर्बंध राहतील.
त्यामध्ये राज्यातील पुणे रेल्वे स्थानकासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुरर्गी आणि लातूर या १४ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
मात्र, यामध्ये वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने सदर निर्बंधांमधून विशेष सूट देण्यात येत आहे.
वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





