पुणे | कोथरूडमध्ये लाडकी बहिण योजनेला प्रतिसाद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, घोषित केली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला १५०० रूपये लाभार्थी बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत.
या योजनेच्या नोंदणीसाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांंच्याकडून मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी शास्त्रीनगर, सुतारदरा आणि कर्वेनगर यासह बाणेर, बालेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात नावनोंदणी सुरू आहे.
या योजने अंतर्गत बालवडकर यांनी नोंदणीसाठी महिलांना आपल्याच परिसरात नोंदणी करता यावी, या उद्देशाने मोबाइल व्हॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मतदारसंघात वेगवेगळ्या भागात ही व्हॅन दिवसभरात नोंदणी करीत आहे. त्यासाठी व्हॅनमध्ये प्रशिक्षित कर्मचारीही आहेत.
या नोंदणीसाठी तीन व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून शासनाच्या योजना घरोघरी पोहचविण्यासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून त्याच अंतर्गत या योजनेचा प्रचारही मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
नोंदणीवर साडी भेट
एका बाजूला महिलांची नोंदणी केली जात असताना अमोल बालवडकर यांच्याकडून नोंदणी करणाऱ्या महिलांना नोंदणी अर्ज भरल्यानंतर अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातूनएक साडी भेट दिली जात आहे. या निर्णयाचे स्वागत करत भावाकडून ही भेट, असे सांगत या सांड्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे महिलांकडून या नोंदणीस कोथरूड मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे.





