पुणे | नागरिकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील नागरिकांकडून दैनंदिन अडचणी आणि समस्यांबाबत महापालिका, तसेच राज्य शासनाकडे वेगवेगळ्या माध्यमांद्वारे तक्रारी येतात. मात्र, या तक्रारी प्रलंबित राहात असल्याने महापालिकेची प्रतिमा खराब होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी विभागप्रमुखांनी १५ दिवसांतून एकदा नियमित बैठक घ्यावी, तसेच अतिरिक्त आयुक्तांनी महिन्यातून एकदा याचा आढावा घ्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त भोसले यांच्याकडून प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेतला जातो. या वेळी अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार करूनही त्याबाबत काहीच कार्यवाही होत नसल्याचे गाऱ्हाणे थेट आयुक्तांच्या समोर मांडले आहे. याची गंभीर दखल घेऊन या तक्रारींबाबत खातरजमा करून घेण्यासाठी आयुक्तांनी ही आढावा बैठक घेतली होती.
तक्रार आणि सूचना वेगळ्या करा
महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अनेक विभागप्रमुखांनी नागरिकांच्या तक्रारींपेक्षा मोठ्या प्रमाणावर सूचना करण्यात येतात, या सूचनांवर उत्तरे, तसेच कारवाई करण्याचा हट्ट नागरिक करतात. याशिवाय अनेक तक्रारी या एकमेकांवर कारवाई करण्याच्या असतात.
त्यामुळे त्या प्रलंबित ठेवाव्या लागत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आयुक्तांनी सूचना, समस्या याचे वर्गीकरण करावे, तसेच नागरिकांना त्यांच्या तक्रारीवर सविस्तर उत्तर द्यावे, अशा सूचना केल्या आहेत.





