Mulshi and Maval: मुळशी, मावळचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याचा ठराव एकमताने मंजूर
Mulshi and Maval: ठराव मंजूर झाल्यानंतर आता राज्य शासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

हिंजवडी – यंदा पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुळशी आणि मावळ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, या मागणीचा ठराव पुणे जिल्हा परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आला.
पुणे जिल्हा परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुचडे पाटील यांनी हा ठराव मांडला. ठाकरे शिवसेनेचे गटनेते विजयसिंह शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत यांनी ठरावाला अनुमोदन दिले. त्यानंतर सभागृहात हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
मुळशी आणि मावळ तालुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतीचे नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील इतर दहा तालुक्यांप्रमाणे या दोन्ही तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली.
दोन्ही तालुक्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, आवश्यक सवलती लागू कराव्यात आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, हा या ठरावामागील प्रमुख उद्देश आहे.
ठराव मंजूर झाल्यानंतर आता राज्य शासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने या ठरावाची दखल घेऊन मुळशी आणि मावळमधील परिस्थितीचा आढावा घ्यावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शिवाजी बुचडे पाटील यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिका
मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या ठरावानंतर शासन स्तरावरही लवकर निर्णय होऊन संबंधित तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





