‘संकल्प पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा’! आळंदी नगरपरिषदेतर्फे ‘शाडू माती’च्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा

आळंदी – आळंदी नगरपरिषदेने समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून “माझी वसुंधरा अभियान 5.0” अभियाना अंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आळंदी नगरपरिषद मार्फत आयोजन केल्याची व या कार्यशाळेत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा नारा दिल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
गणेशोत्सव कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, जे पाण्यात न विरघळणारे व विषारी पदार्थ आहेत. या मुर्त्यांचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर, पर्यावरणपूरक सजावट, निर्माल्य संकलन करून खत निर्मिती इत्यादी बाबत जनजागृती करून सणांच्या काळात होणारे जलप्रदूषण कमी होवू शकते.
पर्यावरणपूरक मूर्त्यांमध्ये शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तीचा समावेश होतो. या मातीमध्ये कोणत्याही प्रकारची विषारी द्रव्ये नसतात. तसेच या मातीपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यात विरघळून जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही. गणेशप्रेमी नागरिकांनी पाण्यात न विरघळणाऱ्या व जल प्रदूषण करणाऱ्या गणेश मुर्त्या विकत न घेता पर्यावरण पूरक अशा शाडूच्या मातीच्या मुर्त्या विकत घ्याव्यात किंवा घरच्या घरी बनवून पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचा प्रयत्न करावा यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत आळंदी नगरपरिषद शालेय विद्यार्थी, शिक्षक वृंद, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या कार्यशाळेस शरद लोहार यांनी उपस्थित राहून शाडू मातीच्या गणेश मुर्त्या बनविणे बाबत विशेष मार्गदर्शन केले.





