पुण्यात रा. स्व. संघाची समन्वय बैठक सुरू

भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प वाहून शुभारंभ
पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तत्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प वाहून “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या बैठकीला गुरूवारी सकाळी नऊ वाजता पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात शुभारंभ करण्यात आला. या बैठकीला 36 संघटनांचे प्रमुख असलेले 267 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, यामध्ये 30 भगिनीही आहेत.
शनिवारपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत सामाजिक परिवर्तनाशी संबंधित पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वदेशी आचरण तसेच नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासंदर्भातही चर्चा होईल. सध्याची राष्ट्रीय आणि सामाजिक परिस्थिती, शिक्षण, सेवा, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. संघटनेचा विस्तार आणि विशेष उपक्रमांच्या माहितीचेही आदानप्रदानही उपस्थित सदस्यांमार्फत करण्यात येईल.
या बैठकीला उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुण कुमार, मुकुंदा आणि रामदत्त चक्रधर, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, सुरेश सोनी, व्ही. भागैय्या, राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, प्रमुख कार्यवाहिका अन्नदानम सीताक्का, “महिला समन्वय’च्या वतीने चंदाताई, “स्त्री शक्ती’च्या अध्यक्षा शैलजा, राष्ट्रीय सेवा भारतीच्या महामंत्री रेणु पाठक,
वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष राजशरण शाही, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी, “विद्या भारती’चे अध्यक्ष रामकृष्ण राव, पूर्व सैनिक सेवा परिषदेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी (निवृत्त), भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष हिरण्मय पंड्या, “संस्कृत भारती’ चे संघटन मंत्री दिनेश कामत आदींचा समावेश आहे.




