Nagar | नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज अखेर ३४३.५ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. तसेच शेजारील पुणे, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पुणे व नाशिक जिल्ह्यातून अहमदनगरमध्ये येणाऱ्या नद्यांच्या व धरणाच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भिमा, प्रवरा, कुकडी व गोड नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे या नदीकाठवरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर धरणातून ४४ हजार ७६८ क्यूसेक, भिमा नदीत दौंड पूल येथून ७४ हजार ४५६ क्यूसेक, प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून २७ हजार ११४, निळवंडे धरणातून २१ हजार ८५५, ओझर बंधारा येथून १ हजार ३९२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे .
कुकडी नदीत येडगाव धरणातून ७ हजार ५०० क्यूसेक, घोड नदीत घोड धरणात १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून खडकवासला व इतर धरणातून विसर्ग सुरू आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस सुरु असून दौंड पुल येथे भिमा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होत आहे.
तरी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील भिमा नदीकाठावरील नागरिकांना अति सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. तरी नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नेवासा या तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
तसेच भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ झाली आहे. तसेच निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरु असून संततधार पाऊस व अतिवृष्टी झाल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. पर्यायाने ओझर बंधा-यावरुन प्रवरा नदीच्या विसर्गामध्ये वाढ होऊ शकते.
त्यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस सुरु असून, येडगाव धरणातून कुकडी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील कुकडी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.





