आजपासून निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन; कोलकातामधील घटनेचा निषेध

Kolkata Doctor Case | कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील एका महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांनी आज 13 ऑगस्ट मंगळवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णसेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन आज सकाळी नऊपासून सुरू होणार आहे. आपत्कालीन विभाग वगळता अन्य विभागांमध्ये निवासी डॉक्टर काम करणार नाहीत.
‘फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया’ (फोरडा) या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या घटनेचा निषेध करून निवासी डॉक्टरांना सुरक्षा पुरवली जावी अशी मागणी केली आहे. हे काम बंद आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे.
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर
राज्यातील आठ ते दहा हजार निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी होणार आहेत. हत्येच्या घटनेनंतर देशभरातील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेमुळे सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आहे. त्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटने’ने (मार्ड) केले आहे.
काय आहेत मागण्या? Kolkata Doctor Case |
- कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी केली जावी.
- वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी.
- रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावी आणि पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.
- तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी.
काय घडलं? Kolkata Doctor Case |
9 ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. महिला डॉक्टरच्या मृतदेहावर अनेक जखमांच्या खुणा होत्या. त्यानंतर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेच्या निषेधार्थ आज देशभरातील डॉक्टरांनी बंद पुकारला आहे.
हेही वाचा:





