आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात फेरबदल

मुंबई: राज्यात करोनाच्या वाढत्या आकड्यांमुळे सध्या चिंतेचं वातावरण असताना राजकीय वातावरणदेखील गरम आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मोठा फेरबदल केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्याच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी अचानक केलेल्या बदल्यांमुळे राजकिय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यातील तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. 1992च्या बॅचच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्या हाती आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यापूर्वी त्यांच्याकडे सामान्य प्रशासन मुख्य प्रोटोकॉल अधिकारी आणि प्रधान सचिवपदाची जबाबदारी होती. तर मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आशुतोष सलिल यांच्याकडे आता पर्यटन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आशुतोष सलिल हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
दुसरीकडे 2016च्या बॅचचे आयएएस अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या खांद्यावर आता यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भंडारा ही जबाबदारी देण्यात आली होती.





