रिझर्व्ह बँकेकडे 879 टन सोने

मुंबई – रिझर्व बँकेने सरलेल्या वर्षात तब्बल 54.13 टन सोन्याची खरेदी केली. त्याचबरोबर या कालावधीत जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले. या कारणामुळे या वर्षात रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 57 टक्क्यांनी वाढवून 4.32 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
31 मार्च 2024 रोजीच्या आकडेवारीनुसार बँकिंग विभागाकडे मालमत्ता म्हणून असलेले सोने 2.74 लाख कोटी रुपयाचे आहे. रिझर्व बँकेकडे 31 मार्च 2024 रोजी 822.10 टन सोने होते. 31 मार्च 2025 रोजी रिझर्व बँकेकडे असलेले सोने वाढून 879.58 इतके झाले आहे. ही माहिती रिझर्व बँकेच्या वार्षिक अहवालात जारी करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षापासून भारतीय रिझर्व बँकेबरोबरच जगातील विविध रिझर्व बँका सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. जागतिक चलन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर विविध देशांदरम्यान युध्द चालू आहे.
अशा परिस्थितीमध्ये सोने बाळगणे जास्त उपयोगी ठरत असल्यामुळे रिझर्व बँका सोन्याची खरेदी करीत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याच्या दारातही वाढ होत आहे.
रिझर्व बँकेनेही या काळात सोने खरेदी वाढविली आहे. त्याचबरोबर रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे रिझर्व बँकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य या वर्षात बर्याच प्रमाणात वाढले आहे. रिझर्व्ह बँका सोने खरेदी करीत असल्यामुळे नागरिकही गुंतवणूक म्हणून सोन्याचे खरेदी वाढवीत आहेत. भारतामध्ये अशा सोन्याची खरेदी बर्याच प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे भारत सोने महाग असनही दर वर्षाला जवळजवळ 800 टन सोन्याचे आयात करतो असे समजले जाते.





