फलटण – फलटण तालुक्यातील 131 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. सर्वात मोठ्या कोळकीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी तर साखरवाडीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे.
अनुसूचित जातीसाठी 19 गावांमध्ये आरक्षण पडले आहे; परंतु काही गावांमध्ये त्या प्रवर्गातील सदस्य नसल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आरक्षणाची सोडत झाली.
पंचायत समिती सदस्या प्रतिभा धुमाळ, सचिन रणवरे, बाळासाहेब ठोंबरे, संजय कापसे, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, पोलीस निरीक्षक भरत किंद्रे, नायब तहसीलदार आर. सी. पाटील, अंकुश इवरे आदींची उपस्थिती होती.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिलासांठी दहा व नऊ ठिकाणी खुले आरक्षण पडले. तावडी, धुमाळवाडी, धुळदेव, जाधववाडी, मुळीकवाडी, शेरेवाडी (ढवळ), घाडगेवाडी, माळेवाडी, सोनगाव येथे महिलांसाठी, तर चिठ्ठीद्वारे मिरेवाडी (दालवडी), खुल्या गटासाठी शेरे-शिंदेवाडी, तांबवे, मिरेवाडी (कुसूर), कोऱ्हाळे, फरांदवाडी, साठे, डोंबाळवाडी, सांगवी, घाडगे मळा, असे आरक्षण झाले.
अनुसूचित जमातीसाठी जोर (कुरवली खुर्द) ही एकमेव ग्रामपंचायत आरक्षित होती. चिठ्ठीद्वारे सरपंचपद या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले. ओबीसी प्रवर्गासाठी 72 गावांमधून 35 गावे चिठ्ठीद्वारे निवडण्यात आली. त्यामध्ये महिलांसाठी जोर (वाखरी), होळ, पवारवाडी, परहर बुद्रुक व खुर्द, झिरपवाडी, पिंपळवाडी (साखरवाडी), तिरकवाडी, चांभारवाडी, विंचुर्णी, भाडळी खुर्द, टाकुबाईचीवाडी, हणमंतवाडी, कोरेगाव, जावली, कांबळेश्वर, नांदल, अलगुडेवाडी, तर खुल्या गटासाठी टाकळवाडे, सालपे, चव्हाणवाडी, मिरढे, रावडी खुर्द, निंबळक, मानेवाडी, विडणी, विठ्ठलवाडी, खुंटे, जाधववाडी (तामखडा), वाठार (निंबाळकर), आरडगाव, कुरवली (बु), दऱ्याचीवाडी, सासकल, उळुंब ही गावे आरक्षित झाली.
खुला प्रवर्गासाठी 76 ग्रामपंचायती आरक्षित होत्या. त्यापैकी चिठ्ठीद्वारे महिलांसाठी वडजल, बिबी, सोनवडी खुर्द, कापडगाव, काशिदवाडी, पिंप्रद, हिंगणगाव, खटके वस्ती, दालवडी, मुरुम, रावडी बुद्रुक, गिरवी, आसू, मिरगाव, झडकबाईचीवाडी, जिंती, तरडफ, कुसूर, गोळेगाव, सस्तेवाडी, सुरवडी, मुंजवडी, सरडे, मठाचीवाडी, वाखरी, खामगाव, शेरेचीवाडी (हिंगणगाव), वडगाव, सासवड, राजाळे, कोळकी, निंभोरे, आदर्की खुर्द, जाधवनगर, फडतरवाडी, सावंतवाडी, गोळेवाडी, दुधेबावी ही गावे आरक्षित आली.
खुल्या गटासाठी माझेरी (पु.), नाईकबोमवाडी, चौधरवाडी, शिंदेमाळ, मलवडी, भाडळी बुद्रुक, ठाकुरकी, बोडकेवाडी, खडकी, वाघोशी, आदर्की बुद्रुक, तरडगाव, वडले, बरड, सोनवडी बुद्रुक, शिंदेनगर, पाडेगाव, उपळवे, गोखळी, वेळोशी, पिराचीवाडी, ढवळेवाडी (निं.), तडवळे, ताथवडा, काळज, कापशी, सोमंथळी, खराडेवाडी, आंदरुड, आळजापूर, शिंदेवाडी, कुरवली खुर्द, भिलकटी, ढवळ, निरगुडी, गुणवरे, ढवळेवाडी (आसू), राजुरी येथील पदे खुली झाली.