भोर तालुक्यातील पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर

भोर : भोर तालुक्यातील आठ पंचायत समिती गणांचे आरक्षण दिनांक १३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. ही घोषणा भोर–महाड मार्गावरील अभिजीत मंगल कार्यालय येथे करण्यात आली. या वेळी भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार अरुण कदम तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यापूर्वीच भोर पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण (महिला) वर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे तालुक्यातील पंचायत समिती गणांच्या आरक्षणाबाबत नागरिक, स्थानिक प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार यांच्यात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जाहीर झालेले पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे:
१) वेळू गण – सर्वसाधारण
२) नसरापूर गण – सर्वसाधारण
३) भोंगवली गण – सर्वसाधारण
४) कामथडी गण – सर्वसाधारण (महिला)
५) भोलावडे गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग
६) शिंद गण – सर्वसाधारण (महिला)
७) उत्रोली गण – सर्वसाधारण (महिला)
८) कारी गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
या आरक्षणामुळे तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही इच्छुक उमेदवारांना या आरक्षणाचा लाभ होणार असताना, काहींच्या उमेदवारीच्या शक्यता कमी झाल्याचेही दिसून येत आहे.
स्थानिक पातळीवरील आघाड्या, पक्षांतर, तसेच नव्या गट–तटांच्या निर्मितीचे संकेतही या पार्श्वभूमीवर उमटू लागले आहेत. आगामी निवडणुकीत भोर तालुक्याच्या सत्तासमीकरणात कोणते नवीन राजकीय चित्र निर्माण होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





