Pune District : जुन्नरला २० जागांचे आरक्षण

जुन्नर : जुन्नर नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग निहाय उमेदवारांचे आरक्षण बुधवार, दि. ८ रोजी नगरपरिषद सभागृहात सोडत पद्धतीने काढण्यात आली. दहा प्रभागातील एकूण वीस उमेदवारांचे आरक्षण निश्चिती करण्यात आले, अशी माहिती उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी चरण कोल्हे, नायब तहसीलदार अनंता गवारी यांसह नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते. तसेच शहरातील शहरातील विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुन्नर नगर परिषदेचे दहा प्रभागातील प्रत्येकी दोन जागांचे आरक्षण पुढील प्रमाणे : प्रभाग क्र. १ अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. २ अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. ४ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. ७ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. ८ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग क्र. ९ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण प्रभाग क्र. १० नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला याप्रमाणे दहा प्रभागातील २० जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आले आहे.
नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव
दरम्यान, जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला याकरिता आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहे. नगरपरिषदेच्या या आरक्षण निश्चितीमुळे जुन्नर नगर परिषदेत खऱ्या अर्थाने महिला राज येणार असून ११ महिलांच्या हाती शहराचा कारभार आगामी पाच वर्षे राहणार आहे. महिलांच्या हाती शहराचा कारभार राहणार असल्याने आता शहराचा खऱ्या अर्थाने विकास होईल, दर्जेदार विकासकामे होतील या प्रतीक्षेत शहरातील नागरिक आहेत.





