Prakash Ambedkar : “विधानसभेला आरक्षण बचाव महत्वाचा मुद्दा असणार” – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar – आगामी विधानसभा निवडणुकीत संविधान बचाव नाही, तर आरक्षण बचाव हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतदार इंडिया आघाडीकडे वळले होते.
विधानसभा निवडणुकीत या दोन्ही समुदायांची मते वंचितकडे पुन्हा येतील, असा दावाही त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला. यावेळी त्यांनी आपला जुना सहकारी पक्ष एमआयमएमवरही टीका केली. एमआयएम प्रामाणिक पक्ष नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
गत लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमची युती होती. मात्र, विधानसभेला कोणत्याही आघाडीत सहभागी न होण्याचा निणर्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2019 पर्यंत आमच्याबरोबर अनेक ओबीसी संघटना होत्या. एमआयएम हा प्रामाणिक पक्ष नव्हता; त्यांनी पळ काढला.
आमचे मुस्लिम बांधवाशी थेट संबंध आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला इतर पक्षांची गरज नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी 20 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे. मागच्या 70 वर्षांत मुस्लिमांना पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले असल्याचे आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर पुढे म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष धोरण ठरवित नाहीत. त्यामुळे यंदाची निवडणूक मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये होणार आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे.
तर, ओबीसींकडून याला विरोध केला जात आहे. त्यामुळे दोन गट तयार झाले आहेत. मराठा हे ओबीसीला मतदान करणार नसल्याचे सांगतात. तर ओबीसी मराठा उमेदवारांना मतदान करणार नाहीत. जरांगे पाटील हे उमेदवार उभे करणार असल्यामुळे राष्ट्रीय पक्षांना फटका नक्कीच बसेल, असे ते म्हणाले.
राहुल गांधी दुटप्पी
प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांच्या जातीय जनगणनेच्या मागणीवर भाष्य केले. राहुल गांधी हे दुटप्पी आहेत. राहुल गांधी बोलतात एक आणि त्यांचा पक्ष करतो दुसरेच.
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिल्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटकने त्यासाठी समिती गठित केली. मात्र, दलित संघटनांचे यावर वेगळे मत असल्याचे ते म्हणाले.





