पिंपरी – कंटेनर, ट्रक आणि टेम्पो या तीन वाहनांचा चाकण शिक्रापूर रस्त्यावर शनिवारी (दि. 7) पहाटे अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये दोन जण अडकल्याची माहिती चाकण एमआयडीसीच्या अग्निशामक विभागास मिळाली. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोत अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
विशाल श्रीराम काळदाते (वय 25) आणि वैभव राजेंद्र काळदाते (वय 25, दोघेही रा. चिंचोली, जामखेड) अशी सुटका केलेल्या जखमींची नावे आहेत. चाकण एमआयडीसी अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर रस्त्यावर शेल पिंपळगाव येथे पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास कंटेनर, ट्रक आणि टेम्पो यांचा अपघात झाला असून त्यामध्ये दोघेजण अडकले असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक शेख यांनी दिली.
बचावासाठी हायड्रोलिक कटरचा वापर
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. टेम्पोत अडकलेल्या दोघांना सहज बाहेर काढणे शक्य नसल्याने हायड्रोलिक कटर व इतर साहित्याचा वापर करण्यात आला. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोतील दोन जखमींना बाहेर काढण्यात यश आले. चाकण एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या पथकाचे या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही कामगिरी चाकण एमआयडीसीच्या अग्निशामक विभागाचे सहायक अग्निशामक अधिकारी राजन फरांदे, व्ही. ए. पवार, व्ही. व्ही. खेडेकर, एस. ए. कुलाल, एल. एच. कचरे यांच्या पथकाने केली.