नेपाळमधील जंगलात हरवलेल्या तिघा भारतीयांची सुटका

काठमांडू – नेपाळच्या नगरकोट जंगलातून बेपत्ता झालेल्या तीन भारतीयांची १० तासांनंतर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. भारतातील ३ पर्यटक आणि त्यांचे नेपाळी मार्गदर्शक जंगलामध्ये हरवले होते. त्यांना तेथून शोधून काढून परत आणण्यात आले आहे.
नितीन तिवारी, रश्मी तिवारी आणि तनिश तिवारी अशी या तिन्ही भारतीय पर्यटकांची नावे असून त्यांच्या समवेत हरी प्रसाद खरेल हे नेपाळी मार्गदर्शक काठमांडूपासून ३० किमी पूर्वेला असलेल्या भक्तपूर जिल्ह्यातील नगरकोट जंगलातील मुहान पोखरी राणी झुला परिसरातून बेपत्ता झाले होते.
हे सर्व भारतीय पर्यटक ३० ते ४० वर्षे दरम्यानच्या वयाचे आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जंगलात रस्ता चुकल्यामुळे हे सर्व जण बेपत्ता झाले होते. मध्यरात्री बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि या सर्वांना शोधून काढले गेले, अशी माहिती प्रभाग क्रमांक ७ चांगुनारायणचे अध्यक्ष श्याम कृष्ण श्रेष्ठ यांनी दिली.
या पर्यटकांना राणी झुला परिसरात जाण्याचा मार्ग सापडला नाही आणि चुकून ते जवळच्या जंगलाच्या दिशेने गेले. ते हलहाळे खोपा परिसरात आढळून आले आणि त्यांना जळवा चावल्याचा त्रास होत होता.
त्यांच्या बेपत्ता झाल्याची बातमी पसरताच सशस्त्र पोलिस दल, लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या पथकाने समन्वित बचाव मोहीम सुरू केली. सुटका केलेले लोक सुखरूप काठमांडूला परतले, असे पोलिसांनी सांगितले.





