Pimpri : खंडाळा घाटातील दरीत अडकलेल्या युवकाची सुटका

लोणावळा : खंडाळा घाटात सुमारे दोनशे मीटर खोल दरीत भरकटत गेलेल्या मुंबईतील एका २९ वर्षीय युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात लोणावळा शहर पोलीस आणि शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला यश मिळाले आहे. एक्सप्रेस हायवेच्या खंडाळा एक्झिट आणि खंडाळा बोगदा यांच्या दरम्यान एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या दरीमध्ये सदर युवक अडकला होता.
शुक्रवारी (दि.३) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास लोणावळा पोलिसांना ११२ या हेल्पलाईन नंबर वर सदर तरुणाचा फोन आला की तो दरीत अडकला आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग मित्र बचाव पथकाला पाचारण केले.
मात्र हा युवक ज्याठिकाणी खाली गेला, त्या ठिकाणाचा अंदाज येत नसल्याने अचूक ठिकाण शोधण्यासाठी वेळ गेला. अखेर युवकाने पाठवलेल्या व्हिडीओच्या मदतीने ठिकाणाचा अंदाज बांधून बचाव पथक त्याच्या जवळ पोहोचले.
त्यानंतर दोरीच्या सहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या संपूर्ण शोध मोहीम आणि बचाव मोहिमेत शिवदुर्गचे योगेश उंबरे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड व सुनिल गायकवाड यांनी तसेच लोणावळा पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहा. पो. नि. राहुल लाड, पोलीस कर्मचारी स्वप्नील पाटील, भूषण कुंवर, पवन कराड आणि होमगार्ड सागर बाळकुंद्रे यांनी सहभाग घेतला होता.





