पिंपरी | इंद्रायणीच्या पुरात अडकलेल्या ३२ जणांची सुटका

देहूगाव, (वार्ताहर) – दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी इंद्रायणी नदीला पूर आला होता. पुरामुळे इंद्रायणी नदीकाठच्या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. येलवाडी गावच्या हद्दीत नदीलगत असलेल्या इमारतींमध्ये अडकलेल्या ३२ जणांची बचाव दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. इंद्रायणी नदीची पाणीपातळी वाढल्याने २४ वर्षांनंतर ब्रिटिशकालीन जुन्या पुलापर्यंत पाणी आले होते.
मावळ तालुक्यासह देहू, देहूरोड परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने आंद्रा, वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. येलवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत इंद्रायणी नदी पात्रा लगत निळ्या रेषेच्या आत बांधलेल्या घरांना, इमारतींना पुराच्या पाण्याने वेढले, त्यातून अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.
काही इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचले होते. यातच काही इमारतींमध्ये नागरिक अडकल्याची माहिती म्हाळुंगे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि रेस्कू टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ३२ जणांना सुखरूप पाण्याबाहेर काढले.





