पुणे | बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी जिल्ह्यातील परिस्थिती बघता आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांना आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. पृथ्वीराज, भारतीय सैन्यदलाचे अमितेश पांण्डेय, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहरातील एकतानगर सिहंगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पुल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरात भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएचे पथक तैनात केले असून, बचाव व मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
लवासा येथे दरड कोसळलेल्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद केली आहे. पुढील ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. घाबरून जाऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या सूचना
– जेथे पाण्याच्या टाकीत पुराचे पाणी शिरले, तिथे टँकरद्वारे पुरवठा
– धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग नियंत्रित करून नियंत्रण
– बाधितांच्या घरी शिधा पोहोचविण्यात येईल
– स्थलांतरीत नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरवा
– अतिवृष्टीत जखमी व्यक्तींचा उपचार खर्च शासनातर्फे
– नैसर्गिक संकटात स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे
प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी द्यावे





