विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी मैदानात ? ; आठवले, गवई, कवाडे गटात चर्चा

Republican Party । राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरात तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोळाबेरीज करण्यासाठी सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरु झालंय. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. मात्र, आता राज्याच्या निवडणुकीत एकसंघ राजकीय आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी मैदानात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिपब्लिकन पक्षांमधील आठवले, गवई, कवाडे गट एकसंध हे आता आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीने यासाठी प्रयत्न सुरू झालेत. चर्चेत भाजपसोबत असलेला आठवलेंचा पक्षही सहभागी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू Republican Party ।
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या विविध संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीने हे प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येतीय. त्यासाठी नुकतीच नागपुरात त्या संदर्भातील एक प्राथमिक बैठक पार पडली.
भाजप, शिवसेनेला मोठा धक्का? Republican Party ।
विशेष म्हणजे, चर्चेच्या पातळीवर या एकसंघ रिपब्लिकन राजकीय आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात सध्या भाजपसोबत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे, तसेच शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले जोगेंद्र कवाडे गटाचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहे. त्यामुळे आठवले आणि कवाडे महायुतीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
राज्यातील छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांना तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या संघटनांना राजकीय आघाडीच्या स्वरूपात एकत्रित आणण्यासाठी एकिकृत रिपब्लिकन समिती ने वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांशी बोलणं करून नागपुरात बैठक बोलावली होती.
महायुती आणि महाविकास आघाडीसमोर नवं आव्हान
बैठकीत आठवले, गवई, कवाडे या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व प्रमुख गटांसह आंबेडकरी विचारसरणीच्या सामाजिक संघटना तसेच बौद्ध महासभेच्या प्रतिनिधींनी ही सहभाग नोंदवला आहे. सर्व छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांची आणि समविचारी सामाजिक संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा अंतिम उद्दिष्ट या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. सर्व रिपब्लिकन पक्षांचा एक पक्ष तयार होण्यास वेळ लागत असेल. तर तोवर रिपब्लिकन पक्षांची राजकीय आघाडी उभारावी आणि त्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, असा धोरणात्मक निर्णय ही त्या बैठकीत झाला आहे.





