पुणे – सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वडगाव, आंबेगाव, वारजे, कोंढवा, एरंडवणे, नऱ्हे व लोणावळा या शाखांमध्ये 76 वा गणतंत्र दिवस मोठ्या थाटामाटात पार पडला. सिंहगड इन्स्टिट्यूट्स च्या वारजे शाखेतील ध्वजारोहण संस्थापक अध्यक्ष प्रो. एम. एन. नवले सर यांच्या हस्ते करण्यात आले. तर वडगाव शाखेचे ध्वजारोहण संस्थेच्या संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रो. एम. एन. नवले सर व संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने ध्वजाला मानवंदना देऊन ‘बाईक रॅली’ने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेले ध्वज संचलन नेत्रदीपक होते.
वडगाव, आंबेगाव, वारजे, कोंढवा, एरंडवणे, नऱ्हे व लोणावळा शाखेच्या विविध क्षेत्रात यशस्वीरित्या मानांकन मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रो. एम. एन. नवले सर व संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करून त्यांचे कौतुक करण्यात आले. यानिमित्ताने विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले.
यात प्रामुख्याने ‘विविधतेत एकता’ या विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक परंपरेची झलक दाखवली. नर्सरी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या नृत्यातून बालचमुने एकतेचा संदेश दिला व शेतकरी, आर्मी, पोलीस, सैनिक हे देशाचे समाजाचे महत्त्वाचा खांब आहेत हे नृत्यनाटिकेतून अधोरेखित केले. कोळी, पंजाबी, गोवन, राजस्थानी, लावणी नृत्याद्वारे भारताची अखंड परंपरा विद्यार्थ्यांनी सादर केली.
‘योग’ हा जीवनाचा अविभाज्य अंग बनतो आहे. देश- परदेशात त्याचे महत्त्व वाढते आहे. त्याचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले, तर महाराष्ट्राची परंपरा जपणारे संगीत नृत्य व वाद्य या सगळ्यांचा मेळ जमवणारे लेझीम नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.