Republic Day 2026 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६ जानेवारी २०२६) आयोजित होणाऱ्या भव्य संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संरक्षण मंत्रालयाने या राष्ट्रीय सोहळ्यासाठी तिकीट विक्रीची अधिकृत घोषणा केली असून, आज (५ जानेवारी २०२६) पासून सामान्य नागरिकांसाठी तिकीटे उपलब्ध झाली आहेत. विशेष बाब म्हणजे, तिकीटांच्या किमती अतिशय परवडणाऱ्या स्वरूपात ठेवण्यात आल्या आहेत, ज्यात सर्वात कमी तिकीट फक्त २० रुपयांचे आहे. या तिकिटांमुळे नागरिकांना राजधानी दिल्लीत होणारे तीन प्रमुख कार्यक्रम थेट पाहण्याची संधी मिळेल. ‘या’ 3 प्रमुख सोहळ्यांसाठी तिकीट उपलब्ध १. प्रजासत्ताक दिन संचलन (२६ जानेवारी): यात देशाची लष्करी ताकद, विविध राज्यांचे चित्ररथ आणि चित्तथरारक फ्लायपास्ट पाहता येईल. २. फुल ड्रेस रिहर्सल (२८ जानेवारी): मुख्य संचलनाची संपूर्ण रंगीत तालीम. ३. बीटिंग द रिट्रीट (२९ जानेवारी): भारतीय वाद्यांच्या संगीतमय धूनचा समारोप सोहळा. तिकिटांचे दर प्रजासत्ताक दिन संचलन: २० रुपये किंवा १०० रुपये (बसण्याच्या जागेनुसार). फुल ड्रेस रिहर्सल: २० रुपये. बीटिंग द रिट्रीट: १०० रुपये. तिकिटांची विक्री ५ जानेवारी ते १४ जानेवारी २०२६ पर्यंत (जागा शिल्लक राहिल्यास) चालेल. ऑनलाइन विक्री रोज सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल. तिकिटे ऑनलाइन कशी खरेदी करावी? संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत पोर्टल www.aamantran.mod.gov.in वरून नागरिक सहजपणे तिकीटे बुक करू शकतात. ही सुविधा देशभरातील लोकांसाठी उपलब्ध आहे, ज्यामुळे रांगेत न थांबता घरी बसून बुकिंग करता येते. बुकिंगसाठी मोबाइल नंबर आणि OTP द्वारे नोंदणी करावी लागेल. ओळखपत्र बंधनकारक तिकीट खरेदी करताना आणि कार्यक्रमाच्या दिवशी प्रवेशासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले कोणतेही मूळ फोटो ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे. हे ओळखपत्र बुकिंग आणि प्रवेश दोन्ही वेळी तेच वापरावे लागेल.अधिक तपशील, सीटिंग प्लॅन, पार्किंग आणि इतर अपडेट्ससाठी rashtraparv.mod.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.