Republic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाची परेड फक्त राजपथावरच का होते, पहिल्यांदा परेड कुठे झाली?

26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा देशात संविधान लागू झाले तेव्हा हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ.राजेंद्र प्रसाद देशाचे पहिले राष्ट्रपती झाले. यानंतर त्यांनी भारताला पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केले. यावर्षी आपण आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्तव्यपथावर (पूर्वीचा राजपथ) परेड काढण्यात येणार आहे. राजपथवर सुरुवातीपासून परेड झाली नाही. मग प्रजासत्ताक दिनी परेड कुठे होती? परेडमध्ये राज्यांमधील झलक कधी समाविष्ट करण्यात आली? परेडचा मार्ग किती लांब आहे? प्रजासत्ताक दिनाशी संबंधित काही रंजक माहिती आम्ही सांगत आहोत.
राज्यघटना लागू झाल्यानंतर देशाला पहिला राष्ट्रपती मिळाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील पुराण किलासमोरील इर्विन स्टेडियमवर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच तिरंगा ध्वज फडकावला, आणि परेडची सलामी घेतली. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली. यावेळी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी हेही उपस्थित होते. पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. इर्विन स्टेडियमला आधी नॅशनल स्टेडियम आणि नंतर मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम असे नाव देण्यात आले.
परेडचे कायमस्वरूपी ठिकाण पाचव्यांदा निश्चित झाले.
देशातील पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा इर्विन स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता, मात्र तोपर्यंत एकही जागा निश्चित करण्यात आली नव्हती. यानंतर लाल किल्ला, किंग्सवे कॅम्प, रामलीला मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अखेर 1955 साली पहिल्यांदा राजपथावर परेडचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाची परेड होत असते. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा मार्ग ५ किलोमीटरहून अधिक लांब आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपती भवनाजवळील रायसीना हिलपासून होते. नंतर इंडिया गेटमधून पुढे गेल्यावर लाल किल्ल्यावर संपते.





