Finance Ministry Report: जर आखातातील युद्ध वाढले. तर त्याचा चलनाच्या विनिमय दरावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत जगाबरोबरच भारतातही महागाई वाढू शकते. खनिज तेलाचे दर आणि पेट्रोलियम पदार्थासह खतांचे दरही वाढू शकतात असे अर्थ मंत्रालयाच्या मासिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित चलनाच्या वित्तीय उत्पादनात गुंतवणूक करण्याची शक्यता वाढेल. अशा परिस्थितीत देशातील परकीय गुंतवणुकीवर परिणाम होऊन रुपयाच्या मूल्यावर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. इराणलगतच्या समुद्रातून जगातील 20% इंधन वाहून नेले जाते. मात्र इराणने या समुद्रातून चीनशिवाय इतर कोणत्याही देशांच्या जहाजांना जाऊ देणार नाही असे सांगितले आहे. त्याचबरोबर इराणने तेल उत्पादन करणार्या अनेक देशांच्या पायाभूत सुविधावर हल्ले केले आहेत. इराणच्या तेल उत्पादनावर आणि विक्रीवरही अमेरिकेच्या निर्बंधामुळे परिणाम झालेला आहे. अशा परिस्थितीत हे युद्ध शक्य तितक्या लवकर निवळण्याची आवश्यकता या अहवालात व्यक्त करण्यात आली. 1991 मध्ये ज्याप्रमाणे खनिज तेलाच्या किमती मध्यपूर्वेतील घडामोडीमुळे वाढल्या होत्या. तसा प्रकार युद्ध रेंगाळल्यास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जागतिक ऊर्जा व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो असे स्पष्ट करण्यात आले. युद्धामुळे आठवड्याभरातच खनिज तेलाच्या किमती 9 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर गॅसच्या किमती 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या तरी भारताची स्थूल अर्थव्यवस्था भक्कम आहे. परकीय चलन साठा 700 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. चालू खात्यावरील तूट पहिल्या सहामाहीत केवळ 0.8 टक्के आहे. त्यामुळे देशातील महागाईचा दर आणि व्याजदर कमी पातळीवर आहे. मात्र युद्ध चिघळल्यास या सर्वच बाबीवर याचा परिणाम होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्याची भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमता आहे. त्याचबरोबर युद्ध थांबल्यानंतर भारत इतर देशापेक्षा वेगाने आगेकूच करू शकेल. कारण भारताचा विकासदर सध्या जगात सर्वात जास्त आहे.