Kartarpur Corridor : करतारपूर कॉरिडॉर पुन्हा सुरू करा.! गुरु नानक जयंतीनिमित्त भगवंत मान यांची PM मोदींकडे मागणी
पंतप्रधान शिख समुदायाच्या भावनांचा आदर करून लवकरच कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Kartarpur Corridor – गुरु नानक देव यांच्या ५५७ व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानमधील करतारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याची विनंती पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. हा कॉरिडॉर गेल्या वर्षी ७ मेपासून बंद आहे.
गुरु नानक देव यांचा प्रकाश पर्व २४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मान यांनी समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे पंतप्रधानांना हे आवाहन केले. शिख भाविकांना त्यांच्या श्रद्धास्थळाचे विनासायास दर्शन घेता यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘नानक नाम लेवा संगत’ दररोज या तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी प्रार्थना करते. भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन पंजाब विधानसभेतही कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला होता, असे मान यांनी सांगितले.
पंतप्रधान शिख समुदायाच्या भावनांचा आदर करून लवकरच कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानमधील गुरुद्वारा दरबार साहिब आणि पंजाबमधील गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक यांना हा कॉरिडॉर जोडतो. गुरु नानक देव यांनी आयुष्याची अखेरची वर्षे दरबार साहिब येथे व्यतीत केली होती. गेल्या महिन्यात पंजाब विधानसभेतही मान यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
श्रद्धेच्या बाबी राजकीय विचारांपेक्षा वरच्या असाव्यात आणि धार्मिक भक्तीचा बळी राजकारणासाठी दिला जाऊ नये, असे त्यांनी म्हटले होते. शिख भाविकांना नियमितपणे दर्शनाची सुविधा मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.






