पुणे | अनधिकृत बांधकामे तातडीने हटवा ; आयुक्तांचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामांमुळे अनेक भागात वाहतूक कोंडी होत असल्याने शहरातील नो हाॅकर्स झोन म्हणून घोषीत केलेल्या ४६ रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
या कारवाईचा अहवाल प्रत्येक आठवड्याला सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अतिक्रमणांबाबत कोणाचाही दबाव न घेता महापालिकेने ही अतिक्रमणे तातडीने काढण्याचे आदेश केंद्रीय सहकार राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांंनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी याबाबतचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
आयुक्त भोसले म्हणाले की, नो हॉकर्स झोनमधील ४६ रस्त्यांसह वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायीक हटविण्यासाठी अतिक्रमण विभागासह वॉर्ड ऑफीसर्सला आदेश देण्यात आले असून त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी मनुष्यबळाची कमतरता होती.
मिळकत करातील ४० टक्के सवलत देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याने तिकडेही कर्मचारी वर्ग केले आहेत. लवकरच हे कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागाकडे देण्यात येतील. पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण सभेने निश्चित केलेल्या नो हॉकर्स झोनमधील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येतील. तसेच, वर्दळीच्या रस्त्यांवरील व पदपथांवरील बेकायदा व्यावसायीकांना देखील हटविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.





