सराफवाडी ते निरवांगी मार्गावरील काटेरी झाडे त्वरीत काढा : अभिजीत तांबिले

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील बाविस गावांच्या हद्दीत असणारा सराफवाडी ते निरवांगी या रस्त्यावर काटेरी झुडपे दळण वळणाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रवासी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हि झाडे झुडपे हटवण्याचे काम संबधित शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले व परीसरातील गावकरी यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले यांचेकडे सराफवाडी येथील ग्रामस्थांनी या रस्त्यावर वाढलेल्या झाडांच्या बाबतीत माहिती दिली. लगेच जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांनी सराफवाडी ते निरवांगी रस्त्याची पाहणी केली. या मार्गालगत झुडपांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्ता अपघातप्रवण बनला आहे. ही गंभीर बाब
असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
मागील काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर झुडपांच्या दाटीमुळे अडथळा निर्माण होऊन सुनिल जाधव या २१ वर्षाच्या युवकाचा ट्रॅक्टर-ट्रेलरला धडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची गांभीर्याने दखल घेत इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक भोसले यांच्याशी तातडीने तांबिले यांनी संपर्क साधला. त्यांनी दोन दिवसांच्या आत सदर रस्त्यावरील झाडे हटवण्याचे आश्वासन दिले आहे.
या पाहणीवेळी सराफवाडी गावचे सरपंच विकास शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य दादासो चांगदेव शिंदे, पांडुरंग कचरे, धनाजी शिंदे, उमेश जाधव, राहुल गोसावी, अतुल वाघमोडे उपस्थित होते.
” विकास कामांना गती देत राहू”
सराफवाडी ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी रस्त्यालगतची ही समस्या लवकरच दूर करण्यात येणार आहे. जनतेच्या सहकार्याने आणि पाठबळाने विकास कामांना गती देत राहू असा शब्द जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले यांनी दिला.





