Harshwardhan Sapkal : कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा अपमान केला आहे.
शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकोटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या माणिकराव कोकाटेंबाबत नाराजी व्यक्त करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते, त्यात कर्जमाफीवरून कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे.
शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही. सरकारची धोरणे जर शेती आणि शेतकऱ्याला अनुकूल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहील, अशी विचारणा देखील त्यांनी केली. भाजप युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. मूठभर उद्योगपतींना 16 लाख कोटींचे कर्जमाफ केले तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही, मग शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारण्याची हिंमत का होते. कोकाटेंनी यापूर्वीही भिखारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देतो असे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला होता.





