Maharashtra Legislative Assembly Winter Session | आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएमवरून सरकारवर हल्ला चढविला आहे. दरम्यान,विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का सहन करावा लागला. यानंतर अनेकांकडून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. याच मुद्यावरून विरोधकांना विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी ईव्हीएमविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’, ‘संविधान वाचवा, ईव्हीएम हटवा’, ‘ईव्हीएम सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांकडून देण्यात आल्या. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, महेश सावंत, नितीन राऊत, भास्कर जाधव, भाई जगताप, विकास ठाकरे, अमित देशमुख, सतेज पाटील, सचिन अहिर, सुधाकर अडबाले, संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, वरुण सरदेसाई आदींची उपस्थिती होती. अंबादास दानवे काय म्हणाले? विधानभवन परिसरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ईव्हीएम हे लोकशाही, राज्यघटनेसाठी घातक आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदानामध्ये ठिकठिकाणी जो घोळ झाला आहे, त्यावरून आमचा ईव्हीएमविरुद्ध रोष आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरात आंदोलन करून ईव्हीएमविरोधी लढाई तीव्र करणार आहे.’ तर भाई जगताप म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र’ असे म्हणतात. प्रत्यक्षात ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट फॉर महायुती’ असे आहे. फडणवीस खोटारडे असून मी त्यांना फसवणीस असे नाव देतो.’ सध्या ईव्हीएम वरून विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.