पुणे जिल्हा | छत्रपती शिवाजीमहाराज जलाशयातील गाळ लोकवर्गणीतून काढण्यास सुरुवात

पिरंगुट, (वार्ताहर)- भूगाव आणि भुकूमच्या शिवेवर असलेला छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील गाळ काढण्यास सुरवात झाली आहे. लोकवर्गणीतून दोन्ही गावातील ग्रामस्थांनी या कामास सुरुवात केली आहे पाटबंधारे विभागाने या ठिकाणी या तलावाची निर्मिती केली.
पूर्वीपासून या तलावाचे पाणी शेतीसाठी दोन्ही गावातील शेतकरी वापरायचे; परंतु सध्या नागरिकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हे पाणी नागरिकांना वापरण्यासाठी नळाद्वारे पुरवठा केला जातो. अनेक वर्षे या तलावामध्ये पावसाचे पाणी येऊन मोठ्या प्रमाणामध्ये तलावात गाळ साठलेला आहे. तो काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोन्ही गावांच्या हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे या तलावातील पाण्याची साठवणूक क्षमता वाढावी या उद्देशाने हा गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.
या कामासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ सरसवले असून ग्रामस्थांच्या वतीने परिसरामध्ये असलेले बांधकाम व्यवसायिक हॉटेल व्यवसायिक यांच्या सहकार्यातून पुढचे चार ते पाच वर्षे हे माती आणि गाळ काढण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी केला. यावेळी भुगाव आणि भुकूम मधील आजी-माजी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
निधी मिळावा
दोन्ही गावांना पाणीपुरवठा करणारा हा तलाव नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. आमदार संग्राम थोपटे यांनी लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दोन्ही ग्रामस्थांनी केली आहे.





