पुणे | भूमिपूजन झाल्यावर “बालाजीनगर’ची आठवण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या तीन वर्षांपासून मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे काम दोनच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.
या सुमारे साडेपाच किलोमीटरच्या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर या मार्गावर बालाजीनगर येथे मेट्रोचे स्थानक अत्यंत आवश्यक असल्याचे महामेट्रो प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यानंतर या स्थानकासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव महापालिकेला पाठविण्यात आला आहे.
आराखड्यानुसार या मार्गावर स्वारगेट, गुलटेकडी, पद्मवती आणि कात्रज अशी चारच स्थानके होती. त्यामुळे बालाजीनगर, धनकवडी, बिबवेवाडी या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
असे असतानाही मेट्रोच्या आराखड्यात या स्थानकाचा आधीच समावेश का केला गेला नाही? असा सवाल उपस्थित केला गेला आहे. तसेच या स्थानकामुळे प्रकल्पाचा खर्चही सुमारे २०० ते ३०० कोटींनी वाढणार आहे. त्याचा खर्च कोण करणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या पहिल्या टप्यातील मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज या मार्गालाही राज्य सरकारने तत्वता मंजुरी दिली होती. त्यानंतर महामेट्रोने या मार्गाचा आराखडा तयार केला.
गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ हा मार्ग अंतिम मंजुरीसाठी रखडला होता. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅनलाइन पद्धतीने या मार्गाचे भूमिपूजन केले.
वर्दळीचा भागच वगळला
या मार्गावरील सर्वाधिक वर्दळ असलेल्या बालाजीनगर परिसरात मेट्रोचे स्टेशन प्रस्तावित करण्यात आले नव्हते. आताआराखड्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बालाजीनगर येथे मेट्रोचे स्थानक उभारणे शक्य असल्याचा अहवाल समोर आला आहे.
त्यामुळे आता मेट्रो स्टेशन उभारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय अध्यक्ष श्रावण हर्डीकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.





