Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूरची बातमी ऐकताच वडिलांची आठवण’, संजय लेलेंच्या मुलाची प्रतिक्रिया

Operation Sindoor : काल मध्यरात्री भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने मध्यरात्री पाकिस्तानी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. हे दहशतवादी अड्डे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होते.
या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. या अॅापरेशनचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. दरम्यान, पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यानी ‘एक ऑपरेशन न करता अनेक ऑपरेशन करून हे दहशतवाद मुळासकट उखडून टाकावा’ असं म्हटलं आहे.
पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता भारताने केलेल्या हल्ल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत ही खरी श्रध्दांजली असल्याचं म्हटलं आहे.
हर्षल लेले याने सांगितली बाबांची आठवण
एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना हर्षल लेले याने त्याच्या बाबांची एक आठवण सांगितली. तो म्हणाला, टीव्हीवर बातमी बघताना मला वडिलांची आठवण आली. जेव्हा पुलवामा हल्ला झालेला तेव्हा बाबांनी मला मिठी मारली होती. आता या हल्ल्यामुळे त्यांना थोडीशी शांती मिळाली असेल. त्यांना वाटलं असेल की, आपण उगाच मेलो नाही देशासाठी मेलो. त्यांना वाटलं असेल देश आपल्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया हर्षल लेले याने दिली.
पुढे म्हणाला, ऑपरेशन सिंदूरमुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला असं म्हणू शकतो. पण, एक ऑपरेशन न करता अनेक ऑपरेशन करून हे दहशतवाद मुळासकट उखडून टाकावा. आर्मी, एअर फोर्स, नेव्ही या तिन्ही बाजूने असे ऑपरेशन्स चालू ठेवावेत, या आधी सुद्धा दोन वेळी आपण हल्ला केला होता, तरी सुद्धा त्यांनी हिंमत केली आहे, आता त्यांना अशी अद्दल घडवायची की त्यांनी परत कधी अटॅक केला नाही पाहिजे, पुन्हा हल्ला करायला ते उरलेच नाही पाहिजे, असंही हर्षल लेले याने म्हटलं.
“ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं”
पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने भारतीय सुरक्षा दलांनी संयुक्तपणे केलेल्या या मोहिमेवर समाधान व्यक्त केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रगती जगदाळे म्हणाल्या की, “दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे आमचे कुंकू पुसले, त्याला हे एक योग्य प्रत्युत्तर आहे.
या ऑपरेशन सिंदूर योग्य नाव दिले आहे. दहशतवाद्यांनी मोदी यांच्या लेकींचे सिंदूर पुसलं. पंतप्रधान मोदी यांना त्याची जाणीव आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकून डोळ्यात पाणी आलं. मी सरकारचे मनापासून आभार मानते,” असे म्हणत त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. Operation Sindoor |





